user

Wayam Magazine

Book and Periodical Publishing
img No Team Available

Overview

‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे ब्रीदवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात. शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाइट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. प्रत्येक महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि एक-दोन लेख/गोष्टी इंग्रजीतून असतात. रंगीत टीव्ही बघणाऱ्या आणि संगणक वापरणाऱ्या पिढीतील मुलांना आकर्षक वाटावे आणि त्यांच्यावर उत्तम डिझाइनचा संस्कार व्हावा, यासाठी आवर्जून उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई केली जाते. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती- मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत. ‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ.आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे आणि श्रीकांत वाड. शिवाय, डॉ. बाळ फोंडके, भारत सासणे, सुबोध जावडेकर, माधुरी पुरंदरे, गणेश मतकरी, मुकुंद टाकसाळे, प्रवीण दवणे, दासू वैद्य, डॉ. शरद काळे, डॉ. नंदिनी देशमुख, श्रीकांत बोजेवार, समीर कर्वे, श्रीराम शिधये, डॉ. उज्ज्वला दळवी, मकरंद जोशी, मेधा आलकरी असे अनेक नामवंत लेखक ‘वयम्’च्या यादीत आहेत. सलग आठ वर्षांत ‘वयम्’ दिवाळी अंकाला विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.), कोकण मराठी साहित्य संघ (को.म.सा.प.), कल्याण सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, साप्ताहिक उल्हास प्रभात, दिन्मार्क पब्लिकेशन या संस्थांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.